परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेल्या मोदींचे कॅमेरा ध्यान, 46 सेकंदांत 20 अँगल्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कन्याकुमारीत विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे सुरू असलेले ध्यान म्हणजे एक इव्हेंटच झाला आहे. 45 तासांसाठी मौन धारण करून मोदी ध्यानाला बसले, पण त्याचे लाइव्ह प्रक्षेपण आणि फोटोंची पुरेपूर काळजी घेण्यात आली. अवघ्या 46 सेकंदांत तब्बल 20 अँगल्सने त्यांचे फोटो टिपण्यात आले. ‘परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेल्या मोदींच्या कॅमेरा ध्यान’वर शेकडो मिम्स, कार्टुन आणि नर्मविनोदी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार गुरुवारी संपला आणि मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे दाखल झाले. गुरुवारी संध्याकाळपासून त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी देशभ्रमणानंतर ज्या ठिकाणी ध्यानधारणा केली होती तेथे ध्यान मंडपम आहे. मोदी या मंडपममध्ये 45 तासांसाठी ध्यान करत आहेत. या काळात त्यांचे मौन आहे. मोदी ध्यानाला बसले म्हणून दोन दिवस पर्यटकांना बंदी आहे. दोन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. समुद्रात सुरक्षा बोटींचाही कडा पहारा आहे. एवढा लवाजमा घेऊन मोदी ध्यान करताहेत.

शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोदींचे ध्यान म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार विरोधी पक्षांनी गुरुवारीच निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आस्था आहे तर घरी ध्यान करायचे – खरगे

पंतप्रधान मोदी कन्याकुमारीत ड्रामा करताहेत. तेथे 10 हजार लोक आहेत. देशाच्या पैशाची ही बरबादी आहे. हा खर्च कोण करणार? देशात आचारसंहिता आहे. आस्था असेल तर मोदींनी घरी ध्यान करायला पाहिजे होते अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फटकारले. राजकारण आणि धर्म हे वेगळे-वेगळे विषय आहेत. राजकारणात धर्म आणू नये, असे खरगे यांनी सुनावले.