सागरी सुरक्षेत हिंदुस्थान ग्लोबल पार्टनर म्हणून पुढे यायला हवा असे सांगतानाच समुद्राला ड्रग्ज, दहशतवाद आणि शस्त्रास्त्र तस्करीपासून सुरक्षित करा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीच्या राष्ट्रार्पणानंतर केले. मुंबईतील माझगाव डॉक येथे ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. गुजरातच्या समुद्रात धडक कारवाई करत आतापर्यंत मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थ पकडण्यात आले, या पार्श्वभूमीवर मोदी यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण होणे, ही हिंदुस्थानच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक बाब आहे. आत्मनिर्भर भारतअंतर्गत हिंदुस्थान संरक्षण उत्पादन, सागरी सुरक्षा आणि आर्थिक प्रगती करत असल्याचे मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. नौदलाच्या वाढलेल्या ताकदीमुळे जगात आपल्याबद्दलचा विश्वास अधिक वाढल्याचेही ते म्हणाले.
हिंदुस्थान जगात जबाबदार आणि विश्वासू मित्र
हिंदुस्थान हा जगात जबाबदार आणि विश्वासू मित्र म्हणून ओळखला जातो. आपला देश विस्तारवाद नाही, तर विकासवादाच्या भावनेने काम करतो. हिंदुस्थानने नेहमी खुले, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक रिजनचे समर्थन केले आहे. समुद्राच्या विकासाची गोष्ट आली तेव्हा हिंदुस्थानने सागर असा मंत्र दिला. सागराचा अर्थ सुरक्षा आणि सर्वांचा विकास, असे मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नवा दृष्टिकोन दिला
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानी नौदलाला नवीन शक्ती आणि एक नवीन दृष्टिकोन दिला होता. आज त्यांच्या पवित्र भूमीवर आपण 21 व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक खूप मोठे पाऊल उचलत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या नौदलाने गेल्या काही महिन्यांत शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांचे संरक्षण केल्याचेही ते म्हणाले.
वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्यूचर
हिंदुस्थानसमोर जी 20 अध्यक्षपद आले तेव्हा जगाला आम्ही मंत्र दिला की, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर. जेव्हा कोरोनाशी लढत होतो तेव्हा हिंदुस्थानने एक दृष्टिकोन दिला. वन अर्थ आणि वन हेल्थ. आम्ही संपूर्ण विश्वाला कुटुंब मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.
हिंदुस्थान सागरी शक्ती बनतोय
हिंदुस्थान सागरी शक्ती बनत असून तो जगाचे सागरी नेतृत्व करेल तसेच जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान म्हणाले. अद्ययावत संरक्षण शस्त्रनिर्मितीतही हिंदुस्थान सक्षम असून आपण आता आर्थिक प्रगतीच्या आणि स्वतःवरील विश्वास वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने नवीन कवाडे खुली केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अद्ययावत शस्त्रनिर्मितीत आपण 1.25 लाख कोटींहून अधिक खर्च केले असून हिंदुस्थान तब्बल 100 हून अधिक देशात संरक्षण साधनसामुग्री निर्यात करत असल्याचे ते म्हणाले.