
दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीय संकल्प आहे. टार्गेट (लक्ष्य), टाईम आणि हल्ला कशा प्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत मांडली. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थान घेणार हे आता स्पष्ट झाले आहे.
जम्मू-काश्मीरात पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 निरापराध पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्याला आज सात दिवस झाले. दहशतवाद्यांचा नायनाट करा, पाकिस्तानचा बदला घ्या, अशी मागणी देशवासियांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते.
सैन्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास
तिन्ही दलांवर संपूर्ण विश्वास असून, लष्कराने हल्ल्याचे टार्गेट आणि वेळ निश्चित करावी. कधी, कुठे आणि कशाप्रकारे हल्ला करायचा हेही लष्कराने ठरवावे. त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका मोदी यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गृहमंत्रालयातही निमलष्करी दलाची बैठक
गृहमंत्रालयातही आज महत्त्वाची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बीएसएफ,एनएसजी, सीआरपीएफ, एसएसबीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उद्या पेंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.