
दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. याच वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट झाली. आता या भेटीतील तपशील समोर आला आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासन हाताळण्याच्या संदर्भात विशेष सुचना केल्याची माहिती मिळते आहे.
प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकता आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा. प्रशासन स्वच्छ असले पाहिजे कुणाचीही पर्वा करू नका, अशा प्रकारच्या कडक सूचना यावेळी करण्यात आल्याचं कळत आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी झालेल्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी या सूचना केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. सरकारचा कारभार स्वच्छ, पारदर्शक असला पाहिजे. तसेच कारभारात शिस्त असली पाहिजे, असंही ते म्हटल्याचं कळत आहे. टीव्ही 9 मराठीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
यामुळे आता मिंधे आणि अजित पवार गटातील वादग्रस्त नेत्यांवर टांगती तलवार पाहायला मिळत आहे. बीड मधील मस्साजोग प्रकरणामुळे अजित पवार गटातून मंत्री झालेले धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. तर मिंधे गटाचे मंत्री भाजपला सातत्यानं समांतर सरकारच्या भूमिकेत जाऊन भाजपसाठी अडचणी निर्माण करत आहेत. या सगळ्यामुळे राज्यातील महायुती सरकारची जनमानसातील प्रतीमा डागाळली आहे.