
सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारकरिता आज तब्बल 13 हजार 500 कोटींच्या योजना जाहीर केल्या. यापैकी काही प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला.
मोदींनी सहरसा-मुंबई अमृत भारत एक्सप्रेस, जयनगर-पाटणा नमो भारत रॅपिड रेल्वे आणि पिपरा-सहरसा आणि सहरसा-समस्तीपूर दरम्यानच्या चार रेल्वे सेवांनाही हिरवा झेंडा दाखवला.
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सुपौल पिपरा रेल्वे मार्ग, हसनपूर बिठण रेल्वे मार्ग आणि छपरा आणि बगाहा येथे दोन-लेन रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी बिहारमधील गोपाळगंज जिह्यातील हथुआ येथे सुमारे 340 कोटी रुपयांच्या रेल्वे अनलोडिंग सुविधेसह एलपीजी बॉटलिंग प्लांटची पायाभरणी केली. तसेच, पंतप्रधान दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत बिहारमधील 2 लाखांहून अधिक स्वयंसहायता गटांना सामुदायिक गुंतवणूक निधी अंतर्गत सुमारे 930 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. पीएमएवाय-ग्रामीणच्या 15 लाख नवीन लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे आणि देशभरातील 10 लाख पीएमएवाय-जी लाभार्थ्यांना हप्ते वाटले.