पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांच्या ग्रीनविले, डेलावेअर येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या फोटोत हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दिसले नाहीत. तसेच डेलावेअरमध्ये पंतप्रधान मोदींसोबत गेलेल्या हिंदुस्थानी अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. मात्र, या बैठकीला डोवाल यांचे अमेरिकन समकक्ष जॅक सुलिव्हन उपस्थित होते. पंतप्रधान मोदींसह परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेतील हिंदुस्थानचे राजदूत विनय क्वात्रा यांच्यासह परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हेही त्यांच्यासोबत होते.
डोवाल सहसा पंतप्रधानांसोबत असतात. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान बायडेन यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे नवी दिल्लीतील राजदूत एरिक गार्सेटी हे देखील होते. अशा परिस्थितीत डोवाल यांच्या अनुपस्थितीवरून चर्चा होत आहे.
या भेटीपूर्वी, खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या याचिकेवर न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात दिवाणी कारवाईचा खटला दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये त्याने काही हिंदुस्थानी अधिकारी आपल्याला ठार मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत नुकसानभरपाईची मागणी केली होती.
डोवाल अमेरिकेला का गेले नाहीत?
या प्रकरणी अमेरिकन कोर्टाने अजित डोवाल, रॉ (R&AW) चे अध्यक्ष सामंत गोयल, कथित गुप्तचर अधिकारी विक्रम यादव आणि आता तुरुंगात असलेल्या व्यावसायिकाला समन्स बजावले आहेत. हिंदुस्थानने हे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीमुळे डोवाल अमेरिकेला गेले नाहीत. मात्र अजित डोवाल यांच्या अनुपस्थितीवर अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.