जम्मू-कश्मीरात रोज रक्तपात होत असून जवान शहीद होत आहेत. असे असताना येथे दहशतवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. किश्तवाड येथे अतिरेक्यांच्या गोळीबारात शुक्रवारीच दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली. गेल्या 24 तासांत खोऱयात दोन ठिकाणी धुमश्चक्री उडाली असून लष्कराने दोन अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीरात दोडा येथे जाहीर सभा घेऊन दहशतवाद शून्यावर आल्याचा छातीठोक दावा केला. पंतप्रधान मोदी हा दावा करत असतानाच अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात नायब सुभेदार विपनकुमार आणि शिपाई अरविंद सिंह हे लष्करी जवान शहीद झाले.
दुसरीकडे बारामुल्ला जिह्यात लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये तुफान चकमक उडाली. पट्टन इलाक्यात उडालेल्या या धुमश्चक्रीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या अगोदर कठुआत उडालेल्या चकमकीतही दोन अतिरेकी ठार झाले.
बारामुल्लात चकमक सुरूच; लष्कराचा अधिकारी जखमी
जम्मू-कश्मीरमध्ये बारामुल्लात अजूनही दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरूच आहे. लष्कराने बारामुल्ला येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर कठुआमध्ये शुक्रवारी रात्री रायझिंग स्टार कोअर या तुकडीने दोन दहशतवाद्यांना ठार केले आणि मोठा शस्त्रसाठा पकडला. दरम्यान, नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांशी आज झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला.
बारामुल्ला येथे लष्करासोबतच जम्मू-कश्मीर पोलीसही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवत आहेत. 11 सप्टेंबरपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये लष्कराने चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांकडून होत असलेली फायरिंग थांबवली.