पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल, असं वक्तव्य आम आदमी पक्षाचे अध्यक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन रॅली घेत आप पक्षावर टीका केली. यालाच केरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ”पंतप्रधान आज 38 मिनिटे बोलले. 29 मिनिटे त्यांनी दिल्लीच्या जनतेला आणि दिल्लीच्या जनतेने निवडून दिलेल्या सरकारला शिव्या दिल्या. पंतप्रधानांनी देशाला दिशा देणे अपेक्षित आहे, मला त्यांच्या वैयक्तिक हल्ल्यांवर जायचे नाही.”
भाजपवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनही पूर्ण केले नाही. 2020 मध्ये त्यांनी जमीन सुधारणांचे आश्वासन दिले होते, आम्ही ते दिल्ली विधानसभेत मंजूर केले. शेतकऱ्यांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत. दिल्ली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अद्याप मालकी हक्क मिळालेला नाही, याचे आश्वासनही पंतप्रधानांनी 2020 मध्ये दिले होते. मास्टर प्लॅन अद्याप अधिसूचित करण्यात आलेला नाही. त्यामुळे दिल्लीचा विकास ठप्प झाला आहे. केंद्राने अद्याप जमीन एकत्रीकरणाचे धोरण स्वीकारलेले नाही.”