मोदींनी घेतली अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष व्हेन्स यांची भेट, द्वीपक्षीय व्यापार करारावर सकारात्मक चर्चा

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. सायंकाळी साडेसहा वाजता व्हेन्स 7, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले. पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर व्हेन्स हे त्यांची पत्नी उषा आणि त्यांची तीन मुले इवानस विवेक आणि मिराबेल यांना निवासस्थानात घेऊन गेले. त्याआधी त्यांनी मुलांना घराची बाग दाखवली तसेच मोराची पिसे त्यांना भेट दिली. त्यानंतर मोदी आणि व्हेन्स यांच्यात द्वीपक्षीय करारावर सकारात्मक चर्चा झाली.

जेडी व्हेन्स आज सकाळी 10 वाजता कुटुंबसह हिंदुस्थानात पोहोचले. ते चार दिवसांच्या दौऱयावर आहेत. दिल्लीच्या पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या स्वागतार्थ पारंपरिक नृत्य सादर करण्या आले. यानंतर व्हेन्स कुटुंबासह दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात गेले. तिथे सुमारे तासभर ते थांबले, त्यानंतर ते जनपथ येथील सेंट्रल काॅजेट इंड्रस्ट्रीज एम्पोरियमला भेट देण्यासाठी गेले. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष 13 वर्षांनंतर हिंदुस्थानच्या दौऱयावर येत आहेत. जो बायडेन यांनी 2013 मध्ये उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा दौरा केला होता.