
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा धुव्वा उडाल्यामुळे भाजपाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय योजले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीची धास्ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. आज पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सर्वच खासदारांसोबत बैठक घेऊन मंथन केले.
या बैठकीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पक्षाचा का धुव्वा उडाला, आगामी विधानसभा निवडणुकीत कसे चित्र राहील, यासंदर्भात पंतप्रधानांनी उपस्थित खासदारांशी मंथन केले. त्याचबरोबर निवडून आलेल्या खासदारांना तुमच्या विजयातले महत्त्वाचे फॅक्टर कोणते, असा प्रश्नही पंतप्रधानांनी विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीसाठी झोकून देऊन काम करण्याच्या सूचना भाजपा खासदारांना दिल्या.
मिंधे, अजित पवार गटाला साधे निमंत्रणही नाही
पंतप्रधान मोदींकडच्या अचानक भेटीमुळे महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची चांगलीच पळापळ झाली. मात्र या भेटीचे साधे निमंत्रणदेखील भाजपाचाच घटकपक्ष असलेल्या मिंधे गट व अजित पवार गटाला देण्यात आले नाही. आम्हाला कसेकाय बैठकीला नाही बोलावले, असा तक्रारीचा सूर काही खासदार लावताना दिसले.