नरेंद्र मोदी म्हणजे खोटे बोलण्याची फॅक्टरी असून ‘खोटे बोल पण रेटून बोल’ एवढेच पंतप्रधान मोदींना माहिती आहे. पदोपदी खोटे बोलणारे मोदी हे खोटारडय़ांचे सरदार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. दरवर्षी दोन कोटी नोकऱया देणे, काळा पैसा देशात आणणे आणि प्रत्येक नागरिकाला 15 लाख रुपये देणे, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणे अशी खोटी आश्वासने मोदींनी दिली. मोदींचा खोटारडेपणा आता लोकांच्याही लक्षात आला आहे. ते लोकांची दिशाभूल करतात. मोदी खोटे बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कारण ते खोटारडय़ांचे सरदार आहेत याचा पुनरुच्चार खरगे यांनी केला.
देशातील बेरोजगारी ही मोठी समस्या आहे आणि सुशिक्षित तरुणांना नोकऱया नाहीत. आम्ही राज्यात विकासाची पंचसूत्री दिलेली आहे. आम्ही केवळ सवंग घोषणा करीत नाही. अर्थसंकल्पावर आधारित आश्वासने दिली आहेत. कर्नाटकात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली आहे. महाराष्ट्रात आमच्या हाती सत्ता द्या, पंचसूत्रीतील सगळय़ा आश्वासनांची पूर्तता करू, असा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी दोन वर्षांत अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आणणार. 11 वर्षे झाली, बुलेट ट्रेन येतच आहे. मोदी ज्याला हात लावतात ती गोष्ट कोसळते. गुजरातमध्ये पूल कोसळला. त्यांच्या काळात किती पूल पडले आणि किती पैसे यांनी खर्च केला याचे माझ्याकडे आकडे आहेत. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, राम मंदिराचे तसेच नवीन संसद भवनाचे छत गळायला लागले. या सगळय़ा गोष्टींना मोदींचा हात लागला होता अशी खोचक टीका खरगे यांनी केली.
खोटारडेपणाचा कळस
कर्नाटकात योजनांची अंमलबजावणी नाही असा भाजपकडून केला जात आहे, पण मोदी यांनी कर्नाटकामधील बजेट वाचावे. कर्नाटकात वीज सवलत योजनांसाठी 9 हजार कोटी ठेवले आहेत. कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असून पाच हजार 15 कोटींची तरतूद केली आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मीसाठी कर्नाटकात दोन हजार एक महिलेला दिले जात आहेत, यासाठी 18 हजार 608 कोटींची तरतूद केली आहे.
एक काय ते ठरवा
‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे, तर ‘एक है तो सेफ है’ असा नारा मोदींनी दिला आहे. दोघांपैकी नेमके कोणाचे ऐकायचे हे तर ठरवा. त्यातच रा. स्व. संघ योगींच्या बाजूने आहे. काँग्रेसने देश एकसंध ठेवण्यासाठी बलिदान दिले, तर मोदी देश तोडत असल्याचा आरोप खरगे यांनी केला.