पंतप्रधान दर पाच वर्षांनी खोटे बोलायला येतात, अरविंद केजरीवाल यांचा हल्ला

जनता भाजपकडून बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ते रोज दिल्लीच्या जनतेला शिव्या देत असून दिल्लीच्या लोकांचा अपमान करत आहेत. भाजपच्या या अपमानाला दिल्लीतील जनता उत्तर देईल. दिल्लीकरांची तक्रार आहे की, पंतप्रधान दर पाच वर्षांनी खोटे बोलतात. खोटी आश्वासने देतात; परंतु ती पूर्ण करत नाहीत, अशा शब्दांत आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

केजरीवाल पुढे म्हणाले, आम्ही दिल्ली ते एनसीआरला जोडणाऱया जलद रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासह तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. आम आदमी पार्टी खूप भांडते असे म्हणणाऱयांना हे उत्तर आहे. सत्य हे आहे की, आप दिल्लीच्या लोकांसाठी काम करते. आमच्यावर झालेल्या अत्याचाराला आम्ही मुद्दा बनवले असते तर आज ही आरआरटीएस लाइन तयार झाली नसती, असे केजरीवाल म्हणाले.