विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला. आता गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर आहे. सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. आज ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्त्याचा मेळावा एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजन विचारेही उपस्थित होते. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत पैसा आणि यंत्रणेचा वापर कसा झाला, हे सर्वांना माहित आहे. त्यांनी सरळ मार्गाने हा विजय मिळवला नाही, असं विनायक राऊत म्हणाले आहेत. तसेच महायुतीने सत्तेला चिकटलेली गोचीड, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
याच कार्यक्रमात बोलताना राजन विचारे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महायुतीवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ईव्हीएममुळे महायुतीचा विजय झाला. यामुळे खचून जाऊ नका, असं ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. ते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा, असं आवाहन यावेळी राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांना केलं.