मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती! पंतप्रधान मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

>> शिल्पा सुर्वे

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेतील भक्ती, शक्ती आणि युक्तीचे कौतुक केले. तसेच दोन वर्षांनी होणारे 100वे मराठी साहित्य संमेलन ‘विशेष’ बनवण्याची तयारी आतापासून करा, असे आवाहन केले.

संसद भवनातील पार पडलेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते.’’

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘मराठीत सौंदर्य आहे, संवेदना आहे. समानता आहे आणि समरसता आहे. त्यात अध्यात्मिकतेचे स्वर आहेत आणि आधुनिकता आहे. मराठीत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. भारताला अध्यात्मिक ऊर्जेची गरज पडली. तेव्हा मराठी संतांनी ऋषींच्या तत्त्वज्ञानाला सोप्या भाषेत सांगितले. महाराष्ट्रातील कितीतरी संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषेतून समाजाला नवीन दिशा दाखवली. आधुनिक काळात ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणाने जो प्रभाव टाकला तो सर्वांना माहीत आहे.’’

‘‘आपलं साहित्य समाजाचा आरसा असतं. साहित्य समाजाचं पथप्रदर्शक असतं. त्यामुळे साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची देशात महत्त्वाची भूमिका असते. गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, वीर सावरकर यांनी आदर्श निर्माण केले आहेत. साहित्य महामंडळ ही परंपरा पुढे नेईल अशी आशा करतो,’’ असेही मोदी म्हणाले. 2027मध्ये अखिल भारतीय मराठी संमेलनाला 150 वर्षे पूर्ण होत आहेत आणि 100वे संमेलन असेल. त्याची आतापासून तयारी करा. युवा वर्गाला सामावून घेत समर्थ आयोजन करा, असे मोदी म्हणाले.

अभिजात मराठीचे भाग्य

मराठीच्या ‘अभिजात’ दर्जाबद्दल भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देश आणि जगात 12 कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोटय़वधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे.

सध्या सर्वत्र ‘छावा’चीच धूम

जेव्हा मुंबईबद्दल बोलले जाते तेव्हा साहित्य आणि सिनेमा येतोच. मुंबई आणि महाराष्ट्रानेच मराठीबरोबरच हिंदी सिनेमांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सध्या तर सर्वत्र छावाचीच धूम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि सिनेमाचे समीकरण उलगडून दाखवतानाच छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम आणि बलिदानाची गाथा सांगणाऱया सिनेमाचे कौतुक केले. छत्रपतींचा हा जीवनपरिचय शिवाजी सावंत यांच्या कादंबरीनेच करुन दिला, असेही मोदी म्हणाले.

मराठीतून भाषण…

पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. आर्थिक राजधानीतून देशाच्या राजधानीत आलेल्या मराठी सारस्वतांना माझा नमस्कार अशी सुरुवात त्यांनी केली. भाषणात त्यांनी समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची संत वचने म्हटली. मराठी भाषा अमृताहून गोड असल्याचे सांगत मराठी संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केल्याचे सांगितले.

पवारांसाठी मोदींनी भरला पाण्याचा ग्लास

कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचा हात पकडून दीपप्रज्वलन केले. पवारांचे भाषण संपल्यानंतर मोदींनी स्वतः पवारांसाठी पाण्याचा ग्लास भरला. त्यांना खुर्चीत बसायला मदत केली.

भाषांच्या नावाने भेदभाव केला जातो…

भारतीय भाषांमध्ये कधीच वैर राहिलं नाही. भाषने नेहमीच एकदुसऱ्यांना आपलंसं केलं आहे. एकमेकांना समृद्ध केलं आहे. पण अनेकदा भाषेच्या नावाने भेदभाव केला जातो. तेव्हा आपल्या भाषेतून उत्तर दिलं जातं. या भेदभावापासून दूर राहिलं पाहिजे. भाषा जपल्या पाहिजेत. हे आपलं कर्तव्य आहे. आपण मराठीसह सर्व भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

कश्मीर कन्या शमिमा अख्तरने मनं जिंकली

पहिल्या उद्घाटन सत्राची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर संमेलनाच्या कार्यक्रमाचा समारोप पसायदान म्हणून झाला. विशेष म्हणजे कश्मीर कन्या शमिमा अख्तरने या साहित्य संमेलनात सर्वांची मनं जिंकली. शमिमाने सूरमधुर आवाजात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीत गायले. तिच्या पहाडी व सुरेल आवाजाने दिल्लीतील सभागृह स्वरमय झाले. समारोपात तिने संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान गायले. शमिमाचे पसायदान ऐकताना पंतप्रधान मोदींसह सर्वच मंत्रमुग्ध झाले.

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्कागताध्यक्ष शरद पवार, ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते.