मनमाड, नाशिक रोडला प्रवाशांचे हाल

कसारा घाटात काल पावसामुळे माती खचल्याने, तर आज मुंबईतील मुसळधार पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याचे चित्र होते. परिणामी, काही गाडय़ा मनमाड ते इगतपुरीच धावल्या, लांब पल्ल्याच्या गाडय़ा 3 ते 9 तास विलंबाने येत असल्याने मनमाड, नाशिकरोड स्थानकावर प्रवाशी खोळंबले होते.

पंचवटी, जनशताब्दी, गोदावरी एक्प्रेस आज इगतपुरीपर्यंत पोहोचल्यानंतर रद्द करण्यात आल्या. नोकरीसाठी मुंबईला जाणाऱया जिल्हावासियांचे प्रचंड हाल झाले. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. रिवा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्प्रेस 9 तास उशिराने धावत होती. बरेली एक्प्रेस आठ तासांनी, गोरखपूर एक्प्रेस सहा तासांनी येणार असल्याने प्रवाशी ताटकळत होते. मुंबईहून येणाऱया आणि जाणाऱया सर्व गाडय़ा तीन ते नऊ तास विलंबाने धावत असल्याने शेकडो प्रवाशी मनमाड, नाशिकरोड स्थानकात थांबून होते. कोणार्क एक्प्रेस, दुरांतो, नंदीग्राम, पाटलीपुत्र, कोलकता, गरीबरथ, कोईंबतूर, कृषीनगर, विदर्भ एक्प्रेससह नाशिकरोडमार्गे जाणाऱ्या पंधरा गाडय़ा दीड ते नऊ तास विलंबाने पोहोचत होत्या.