पर्थ कसोटी सुरू होण्यापूर्वीच हिंदुस्थानी संघावर दडपण वाढलेय. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी पर्थला पोहोचणार नाहीय तर दुखापतीमुळे शुबमन गिलला मुकावे लागणार आहे. त्यामुळे साहजिक संघावर दडपण आणि दबाब वाढणार, पण हिंदुस्थानचे महान कर्णधार कपिलदेव यांनी हिंदुस्थानच्या खेळाडूंना कानमंत्र दिलाय, हिंदुस्थानी संघाला मनापासून शुभेच्छा. जास्त काही ऐकू नका, जा आणि स्वतःचा खेळ दाखवा. जो जोरदार खेळणार तोच जिंकणार. दबाबाशिवाय खेळा.
येत्या 22 नोव्हेंबरपासून पर्थवर हिंदुस्थानी संघाची बॉगाक कसोटी मालिकेसाठी अग्निपरीक्षा सुरू होतेय. न्यूझीलंडविरुद्धचा लाजिरवाणा पराभव विसरून हिंदुस्थानी संघाला पर्थवर उतरायचेय. पण या कसोटीपूर्वी एकीकडे हिंदुस्थानी संघावर दुखापतींचा जोरदार मारा केला जातोय. तर कर्णधार रोहित शर्मा बाबा झाल्याचा आनंद पर्थऐवजी मुंबईतच साजरा करणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराच्या हाती संघाचे नेतृत्व असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ भिडत असताना हिंदुस्थानी संघ काहीसा कमकुवत वाटू लागला आहे. अचानक संघात झालेल्या या बदलामुळे संघावर आणि संघ नेतृत्वावर साहजिकच दबाव वाढलाय. या अनुषंगाने कपिलदेव यांना संघाबाबत छेडले असता त्याने संघाला एकच कानमंत्र दिला, परिस्थिती कशीही असू दे, दबावाशिवाय खेळा, जास्त ऐकू नका. आपल्या खेळातून व्यक्त व्हा. माझ्या संघाला दणदणीत शुभेच्छा. जास्त दबाव घेऊ नका. जो चांगला खेळणार, तोच जिंकणार!