रायगडात किनारपट्टीवरील वादळी वाऱ्यांना ‘बांबू’लागणार, जिल्ह्यात 35 लाख बांबू रोपांची लागवड

कोकण किनारपट्टीला गेल्या काही वर्षात निसर्ग, तौक्ते, फयान, महा, क्यार अशा वादळांचा तडाखा बसला. या वादळामुळे जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. या अस्मानी संकटांना ‘बांबू’ लावण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात 35 लाख बांबूच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. बांबूंची ही मजबूत भिंत अरबी समुद्रातून येणाऱ्या भयंकर वादळी तडाख्यांना रोखणार आहे. त्यामुळे किनारपट्टीचे होणारे मोठे नुकसान थांबणार आहे.

सामाजिक वनीकरण विभागाने किनारपट्टीवरील भागात लावलेली सुरूची झाडे वादळाचा तडाखा थोपवण्यात अपयशी ठरली आहेत. त्यामुळे वादळांना थोपवू शकतील, त्यांचा तडाखा सहन करू शकतील अशा झाडांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार वादळाचा तडाखा सहन करण्यास बांबू सक्षम असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात बांबू लागवड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३५ लाख रोपे लावण्यात येणार आहेत. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाने यासाठी रोपवाटिका तयार केल्या असून, लवकरच या रोपांची लागवड केली जाणार आहे. किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या बांबूंची मदत होऊ शकणार आहे. त्याचबरोबर बुरूड समाजाला निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी बांबू उपयुक्त ठरणार आहे.

पडीक, गायरान जमिनी होणार हिरव्यागार

जिल्ह्यात १ कोटी बांबू लागवडीची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. खासगी आणि शासकीय जमिनींवर ही लागवड केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पडीक जमिनी, बांधावर बांबू लागवड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर पडीक जमीन, गायरान जमीन, गावठान जमीन, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाच्या धरणाच्या बाजूला ही रोपे लावणार आहे. त्यामुळे परिसर हिरवागार होणार आहे. खासगी जागेवरील लागवडीसाठी लाभार्थ्यांना ७ लाख रकमेपर्यंतचा लाभ मिळणार आहे.

बाबूंच्या लागवडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड केल्यास त्यांना जोड उत्पन्न मिळू शकेल. बुरूड समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने राहतो. त्यांना परराज्यातून बांबू आणावा लागतो. या लागवडीमुळे बांबू जिल्ह्यात उपलब्ध होऊ शकेल.

■ किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड