
ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असलेल्या मावळ तालुक्यातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ आणि कामशेत या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याबाबत गृह विभाग सकारात्मक नाही. लोणावळ्यात पर्यटक पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लोणावळा शहर पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सुरुवातीला आयुक्तालयाच्या हद्दीत १५ पोलीस ठाणी होती. त्यानंतर रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. त्यामुळे १८ पोलीस ठाणे होती. काही महिन्यांपूर्वी वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. आयुक्तालयांतर्गत आता सायबर पोलीस ठाण्यासह २३ पोलीस ठाणी आहेत. आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असतानाच ग्रामीण हद्दीतील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ आणि कामशेत ही चार ठाणी पिंपरी आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला.
लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघात, घातपात आणि अन्य घटनांमध्ये ग्रामीण पोलिसांना मदत उपलब्ध करून देण्यात उशीर होतो. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या नियंत्रणाखाली आणल्यास या समस्या अधिक प्रभावीपणे हाताळता येतील, असा दावा केला. परंतु, लोणावळा पिंपरीत घेण्यास शासन सकारात्मक नाही. शहर पोलिसांना ग्रामीण भागात गस्त घालणे शक्य होणार नाही. त्यासाठी स्वतंत्र पर्यटक पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
ग्रामीण पोलिसांची कामगिरी
मागील काही वर्षांपासून पुणे ग्रामीण पोलीस दलाची कामगिरी ही वाखाणण्याजोगी राहिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाने ग्रामीण भागातील ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त वाढविली आहे. ग्रामरक्षक दलाची याकामी मदत होते. यासह तडीपार, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. मावळ तालुक्यात पुणे ग्रामीण हद्दीतील ग्रामीण भाग हा पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील परिसरापेक्षा अधिक सुरक्षित असल्याची परिस्थिती आहे.
आयुक्तालयाकडे अगोदरच अतिभार
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ जवळपास ११५ चौरस किलोमीटर असून, अंदाजे ४० लाख लोकसंख्या आहे. पिंपरी-चिंचवड शहर, बावधन, बालेवाडी, ग्रामीणमधील चाकण, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे हा परिसर आयुक्तालयांतर्गत येत आहे. आळंदी-मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. सध्या आयुक्तालयाकडे असलेल्या या भागातही पायाभूत सुविधा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे. अशात नवा भाग आयुक्तालयात जोडल्यास तिथे पिंपरी-चिंचवड पोलीस किती यशस्वी होईल, ही शंका आहे.