नवी मुंबई विमानतळावर मोठे व्यावसायिक विमान उतरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. धावपट्टीवरील लायटिंगची चाचणी घेण्यासाठी या विमानतळावर पुन्हा विमानतळ प्राधिकरणाच्या विमानाने घिरट्या घातल्या. ही चाचणी यशस्वी झाल्याचे विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले. ही शेवटची चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावर थेट मोठे विमान उतरवण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच चाचण्यांमध्ये विमानतळ पास झाले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणार असून त्यानंतर विमानतळ प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. विमानतळावर सिग्नल आणि रडार यंत्रणेच्या पाठोपाठ आता धावपट्टीवरील लायटिंगची चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी तब्बल दोन तास धावपट्टीवर लहान विमान चाचणीसाठी घिरट्या घालत होते. विमान उतरवण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शवणाऱ्या दिव्यांचा (लायटिंगचा) आधार घ्यावा लागतो. धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृश्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यामुळे धावपट्टीवर मोठे विमान उतरवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यानंतर नवीन मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमान उतरविण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
पीएपीआयमध्ये पांढरे, लाल दिवे
विमातळाच्या धावपट्टीवरील लायटिंगला प्रिसिजन अॅप्रोच इंडिकेटर (पीएपीआय) यंत्रणा म्हणतात. विमान उतरताना व्हिज्युअल मार्गदर्शन देण्यासाठी ही प्रणाली कलर-कोडेड दिवे वापरते. ज्यामुळे वैमानिकांना त्यांच्या दृष्टिकोनाचे अचूक मूल्यांकन करता येते. धावपट्टीवरील चार दिवे लाल आणि पांढऱ्या रंगाचे असतात. जेव्हा वैमानिक समान संख्येने लाल आणि पांढरे दिवे पाहतात त्यानंतरच विमानाचे लॅंण्डिंग केले जाते.