महिलांचा अवमान करणारे मुनगंटीवार, सत्तार आणि राठोड यांनाही निलंबित करा! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

विधान परिषदेत शिवसेनेने मिळवलेला दणदणीत विजय झाकोळून टाकण्यासाठीच दानवेंच्या निलंबनाचा निर्णय घेतला गेलाय. जेणेकरून विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि निलंबनाच्या निर्णयाची चर्चा होईल. येणारी विधान परिषदेची निवडणूकही आम्ही तीनही मित्रपक्ष सोबतच्या घटकपक्षांसह ताकदीने लढवू आणि तीनही उमेदवार निवडून आणू.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. सभापतींच्या या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला. कोणतीही बाजू मांडू न देता एकतर्फी निर्णय घेऊन विरोधी पक्षनेत्याला निलंबित करणे हे ठरवून रचलेले षड्यंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला. दानवेंना निलंबित करता, मग महिलांचा अवमान करणारे सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनाही निलंबित करा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.  

विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अंबादास दानवे यांचे आज सभापती नीलम गोऱ्हे यांनी पाच दिवसांसाठी निलंबन केले. महिलांचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सभापतींच्या निर्णयाचा निषेध केला.

सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणे गरजेचे असते. दुसरी बाजूही मांडू देणे लोकशाहीसाठी आवश्यक असते आणि त्यानंतरच निर्णय घ्यायला हवा. निर्णयाचा अधिकार अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण एका कोणाकडून मागणी झाली म्हणून निलंबनाचा निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आणि मारक आहे तसेच लोकशाहीविरोधी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात असे पहिल्यांदा घडले असेल असे सांगतानाच, जनता डोळे उघडे ठेवून ते पाहत आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

बोगस अर्थसंकल्पाची चिरफाड करायला महाविकास आघाडीने सुरुवात केल्याने मूळ मुद्दा बाजूला टाकावा म्हणून आकसाने दानवे यांचे निलंबन केले गेले, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. विधिमंडळात जनतेचा आवाज मांडत असताना, जनतेसाठी आवाज उठवत असताना विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले जातेय, मग सामान्य जनतेची काय कथा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, विधान परिषदेत सत्ताधारी मंडळी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव आणू इच्छित होती. तो ठरावच मुळात चुकीचा होता. त्याचा या सभागृहाशी संबंध काय असा मुद्दा दानवे यांनी मांडला होता. मुळात राहुल गांधी यांचे भाषण मीसुद्धा ऐकले, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे ते म्हणाले होते. त्या अपुऱ्या माहितीवर विधान परिषदेत ठराव आणला जाणार होता, असे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले.

जय संविधानला विरोध करणाऱ्यांच्याही निषेधाचा ठराव आणा

लोकसभेत शपथविधीवेळी जय संविधान बोलल्यानंतर ज्यांना मिरच्या झोंबल्या त्यांच्या निषेधाचाही इथे ठराव आणावा आणि लोकसभेत पाठवावा, अशी विनंती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही सभागृहांना केली. जय संविधानला विरोध करणाऱ्यांचा शिवसेना जाहीर निषेध करते, असेही ते म्हणाले.

लोकसभा प्रचारादरम्यान सुधीर मुनगंटीवारांनी बहीण-भावाच्या नात्याबद्दल अभद्र वक्तव्य केले होते त्याची माफी कोण मागणार? सत्तारांनी सुप्रिया सुळेंना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती तो महिलांचा अपमान नाही का? आणखी एका मंत्र्यावर महिलेबाबत विचित्र प्रसंग घडला होता, त्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकले होते, त्यांना मिंधे सरकारने पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले, तो अपमान नाही का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

मी माफी मागतोय, तसा त्यांनीही अपमान केलाय. सभागृहात केला म्हणून अपमान आणि जाहीरपणाने बोलले  म्हणजे नाही हे कोणते गणित? त्यांना सरकार निलंबित करणार की नाही? मुनगंटीवारांना तर जनतेने लोकसभेतून निलंबित केलेय आता विधानसभेतही करतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्रातील माताभगिनींची माफी मागतो

उद्धव ठाकरे यांनी यावेळी दानवे यांची बाजू उचलून धरली. शिवसेना भवन चाल करून येणारी माणसे बोट दाखवून बोलत असतील तर संबंधच येत नाही. आक्षेप घेणाऱ्यांनी सभापतींना सांगायला हवे होते. दानवे यांनी शिवीगाळ केल्याबद्दल आक्षेप असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातील माताभगिनींची माफी मागतो, असे उद्धव ठाकरे विनम्रपणे म्हणाले.

चुकीचा ठराव आणणे हासुद्धा सभागृहाचा अवमान

राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा अवमान केलाच नाही. तरीही इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या निषेधाचा ठराव आणून बहुमताच्या जोरावर मंजूर करून लोकसभेला पाठवलाही असता. पण असत्य माहितीच्या आधारे ठराव आणू पाहणे हासद्धा सभागृहाचा अवमान आहे. मग तसे करू पाहणाऱ्या सदस्याला सभापती निलंबित करणार का, असा सवाल करताना तसा निलंबनाचा ठराव आता विरोधी पक्षानेच आणला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.