
अमेरिकेत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण फ्लोरिडामध्ये एक छोटे विमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. दक्षिण फ्लोरिडाच्या बोका रॅटन भागात हा अपघात झाला. विमान कोसळले आणि एका कारला धडकले. अपघातानतर बोका रॅटन विमानतळ परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, सेस्ना 310 या विमानाने रॅटन विमानतळावरून तल्लाहसीसाठी उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच ते कोसळले आणि एका कारवर धडकले. यानंतर विमानाने पेट घेतला. यात विमानातील तीनही जणांचा मृत्यू झाला. विमानाने धडक दिल्यानंतर कार फरफटत बाजूच्या रेल्वेट्रॅकवर गेली. अपघातानंतर रेल्वेसेवाही ठप्प झाली. विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.