महानंदच्या शेकडो एकर मालमत्तेवर डोळा, महानंद अमूलच्या घशात घालण्याचा डाव; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

महाराष्ट्र शासनाचा महानंद प्रकल्प राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे चालवायला देण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प अमूलच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. महानंदच्या शेकडो एकर मालमत्तेवर डोळा असून ते हडप करण्याचा हा डाव असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी केला.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा महानंद हा प्रकल्प राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ म्हणजेच एनडीडीबीला चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे हा प्रकल्प अमूलच्या घशात घालण्याचा डाव आहे. महानंदच्या मुंबईत शेकडो एकर जागा आहेत. त्या जागांवर डोळा आहे. भाजप जसं सांगेल तसं हे राज्याचे सरकार महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवत आहे, असा आरोपही खासदार विनायक राऊत यांनी केला. रेसकोर्स आणि मानखुर्द येथील जागाही हडप करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी करत राज्यसरकारवर टीका केली.

उदय सामंत यांची ओळख निरुद्योगी मंत्री अशी झाली आहे. ते उद्योगमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यांच्याच मतदार संघातील जे.के.फाईल प्रकल्पही बुडाला. ते वाचवू शकले नाहीत आणि वेंगुर्ल्याचा पाणबुडी प्रकल्प शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यामुळे गुजरातला गेला असा आरोप ते करतात. हे निर्बुद्धपणाचे असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदार संघात महाविकास आघाडीच जिंकणार
सावंतवाडी मतदार संघात दीपक केसरकर आणि रत्नागिरी मतदार संघात उदय सामंत यांचा पराभव अटळ आहे. या दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीच जिंकेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातही भाजपकडे उमेदवार नाही. म्हणूनच ते ह्याची त्याची नावे घेत आहेत. १५ मार्चपर्यंत ते उमेदवारांची अशीच नावे घेत राहतील अशी टीका खासदार राऊत यांनी केली.