‘आयआयटी मुंबई’चे प्लेसमेंट सेशन येत्या 1 डिसेंबर 2024पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आयटी सेक्टरमधील कंपन्यांकडून कमीत कमी सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळावे, अशी अपेक्षा ‘आयआयटी मुंबई’ने व्यक्त केली. मागील प्लेसमेंट सेशनमध्ये आयटीटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना काही आयटी कंपन्यांनी फक्त चार लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले होते. गेल्या वर्षी सात कंपन्यांनी 10 विद्यार्थ्यांना 4 ते 6 लाख रुपयांचे पॅकेज दिले होते. या पार्श्वभूमीवर यंदा आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांना किमान सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळावे, अशी मागणी केलीय. 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱया आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेशनमध्ये आवश्यक बदल दिसून येतील. आयटी कंपन्यांना फारसे स्वारस्य दिसत नसल्याने या वेळी कोअर सेक्टरच्या कंपनीसोबत अधिक भागीदारी होईल.
विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांनुसार आयआयटी मुंबईने नवीन स्टार्टअप आणि पीएसयूना आमंत्रित केलंय. आयटी सेक्टरकडून कमी मागणी मिळत असल्याने इंटरनॅशनल हायरिंगची आशा आहे. प्लेसमेंट सेशनमध्ये यंदा जपानच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांसोबत नोकरीची संधी मिळू शकते.
या वर्षी प्लेसमेंट सेशनसाठी 2400 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईला 300 प्री प्लेसमेंट ऑफर मिळाल्या होत्या. त्यातील 258 स्वीकारण्यात आल्या होत्या.
आयआयटी मुंबईच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पश्चात 2021 आणि 2022 साली आयटी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना मागणी वाढली होती. मात्र गेल्या वर्षी ही मागणी कमी झाली.