
मनुष्य आणि श्वान यांचं नातं अनेक वर्षांपासून अतूट असं राहिलेलं आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. अंगणात खेळत असलेल्या एका चिमुरड्याचा जीव पिटबुल डॉगने वाचवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील झांसीच्या श्रीगणेश कॉलनीमधील आहे. या ठिकाणी चिमुरडे खेळत होते. त्याचक्षणी या ठिकाणी एक किंग कोब्रा साप दिसला.
सापाला पाहून मुले घाबरली. परंतु पिटबुल डॉगने सापाला पाहताच मुलाच्या संरक्षणासाठी सापाच्या दिशेने धाव घेतली. पिटबुल डॉगने 6 फूट लांब असलेल्या किंग कोब्रा सापावर हल्ला चढवला. सापाला तोंडात पकडून आपटून आपटून मारल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून या श्वानाचे कौतुक केले जात आहे.