जळगावात 100 पिस्तुलांसह रिव्हॉल्व्हर जप्त, अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले

जळगाव जिह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिह्यामध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री व तस्करीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात 1 जानेवारी 2024 ते 31 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पोलिसांनी 100 पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी 98 आरोपींविरोधात कारवाईचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 25 लाख 98 हजार 300 रुपयांच्या 166 काडतुसांचा मुद्देमालाचा समावेश आहे.

जिह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध शस्त्र खरेदी विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाया करण्यात आल्यात. जळगाव जिल्हा सातपुडा पर्वत व मध्य प्रदेश राज्याजवळ असल्याने अवैध शस्त्र विक्री तस्करांना हा मार्ग खुला मिळत असतो. महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या बॉर्डरवर अवैध शस्त्र निर्माण करण्याचे काम केले जाते. यात मुख्यतः लहान उमर्टी व मोठी उमर्टी या ठिकाणांचा समावेश आहे. येथेच यावल मार्गे, चोपडा मार्गे अशा अनेक मार्गांनी अवैध शस्त्रांची ने-आण केली जाते.

जळगाव जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मागील 11 महिन्यांत 63 केसेसची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत पोलिसांतर्फे 100 पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर तसेच मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यात 166 काडतूस यांचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेला हा सर्व मुद्देमाल 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा आहे. या कारवाया 1 जानेवारी 2024 ते 31 नोव्हेंबर 2024 या कालावधीतील आहेत.