जालन्यात गावठी पिस्तूलासह 5 जिवंत काडतुसांसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल

जालना शहरातील राहुलनगरातील एका आरोपीच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी एक गावठी पिस्तूलसह पाच जिवंत काडतुसे व एक कार असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तू बाळगणाऱ्याची माहिती घेत कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास दिले होते. त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या, कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना पथकाला माहिती मिळाली की, अनिल गोरखनाथ जाधव (रा. राहुलनगर, रेल्वे पटरी जवळ, जालना) हा अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगून आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता आरोपी आनंद नगर परिसरात चौकात कारसह असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे आणि एक कार असा एकूण 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.