नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याच्या बॅगेत पिस्तुलच्या गोळ्या सापडल्या, श्रीनगर विमानतळावरून घेतले ताब्यात

जम्मू-काश्मीरमधील बिजबेहारा विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बशीर अहमद वीरी यांच्या सामानात पिस्तुलच्या गोळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. वीरी यांना श्रीनगर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.

जम्मूला जात असताना श्रीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान वीरी यांच्या बॅगेत पिस्तुलच्या दोन गोळ्या सापडल्या. यानंतर आमदार वीरी यांना तात्काळ ताब्यात घेत चौकशीसाठी हुमहामा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

वीरी यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल असून पिस्तुलच्या दोन गोळ्या चुकून त्यांच्या बॅगेत राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र श्रीनगर पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वीरी विजयी

57 वर्षीय बशीर अहमद वीरी हे पेशाने डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बशीर अहमद वीरी यांनी बिजबेहारा विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. वीरी यांनी निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांचा मोठ्या मतांनी पराभव केला.