
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्याध्यक्ष, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष, भोसरी विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारी राजीनामे दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राजीनामा पाठविला आहे. अपरिहार्य कारणास्तव राजीनामा दिल्याचे पत्रात म्हटले आहे. या पदाधिकाऱयांसह तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील 15 ते 20 माजी नगरसेवकही ‘तुतारी’ हाती घेण्याच्या तयारीत आहेत.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत, मात्र भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे विद्यमान आमदार आहेत. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र आहे. हा मतदारसंघ भाजपलाच सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही समस्या मांडली होती. पवार यांनी तुम्ही घाई करताय, पक्षात थांबा असेही सांगितले होते.
त्यानंतर गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची समर्थक माजी नगरसेवकांसह भेट घेतली होती. तसेच पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मंगळवारी गव्हाणे यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनीही राजीनामे दिले आहेत. गव्हाणे यांच्यासह पदाधिकाऱयांनी राजीनामा दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का बसला आहे.
15 ते 20 माजी नगरसेवक तुतारी वाजविण्याच्या तयारीत
गव्हाणे यांच्यासह पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील 15 ते 20 माजी नगरसेवक ‘तुतारी’ वाजविण्याच्या तयारीत आहेत. या सर्वांचा उद्या, बुधवारी शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.