भोसरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे पैसे सापडल्याचा आणि त्यांना अटक केल्याचा फेक नरेटिव्ह भाजप उमेदवाराकडून केला जात आहे. भाजप उमेदवाराचे कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तात पैशांचे खुलेआम वाटप करत असून, पोलीस, निवडणूक विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्यास भोसरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. पोलिसांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात असल्याचेही पदाधिकारी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वतीने कासारवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेस अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले, ‘भोसरी मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट केला जात आहे. शनिवारी रात्री मतदारसंघातील गव्हाणे वस्ती भागामध्ये दोन कोटी रुपये सापडले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती पसरवण्यात आली. जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवली जात आहे. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. दिघी पोलीस ठाण्यामधील पोलीस खुलेआम भाजप आमदाराला सहकार्य करत आहे. हे प्रकार राजरोसपणे सुरू असताना कोणतीही कारवाई होत नाही. हे लोकशाहीचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. भोसरीत गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली दहशत, दडपशाहीला नागरिक मतदानातून चोख उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विलास लांडे म्हणाले, ‘जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. खोटी माहिती मतदारसंघात पसरवली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, निवडणूक विभाग अशा सगळ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र पोलीस सहकार्य करत नाहीत.
कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी दिला.
‘उलटा चोर कोतवाल को दाटे’
■ भोसरी मतदारसंघामध्ये ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ असा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लेखी स्वरूपाची अनेक पत्रे पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली. भाजप पदाधिकाऱ्यांसाठी पोलीस यंत्रणा राबवली जात आहे. ‘वरून आदेश आले आहेत’ असे काही पोलीस अधिकारी खासगीत आम्हाला सांगतात. साम-दाम- दंड-भेद असे सगळे प्रकार वापरून भोसरी विधानसभेमध्ये पैसे वाटपाचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. नागरिक पैसे वाटप झाले म्हणून सांगतात. पोलिसांकडे तक्रार केली की, पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रचार स्लिप वाटत असताना अटक केली जाते. खोट्या गुन्ह्यांच्या नावाखाली त्यांना अडकवले जात आहे.