गंगेचे पाणी.. हडss.. मी नाही पिणार! राज ठाकरे यांनी गंगाजल नाकारलं

पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यातील श्रद्धा-अंधश्रद्धेवर एक विधान केलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा एक किस्साही त्यांनी यावेळी सांगितला आहे.

या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, “मुंबईत एक बैठक होती, त्या बैठकीला मुंबईतील काही शाखा अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष हे हजर नव्हते. जे हजर झाले नाही त्यांची मी हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं तर, त्यातील पाच – सहा जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. मी म्हटलं त्यांना, कशाला करता पापं? मी हेही विचारलं आल्यावरती, अंघोळ केलीस ना?”

‘गंगेचे पाणी.. हडss.. मी नाही पिणार’

यावेळी बाळा नांदगावकर यांचा किस्सा सांगत राज ठाकरे म्हणाले, “बाळा नांदगांवकर छोट्याशा कमंडलमधून गंगेचं पाणी घेऊन आले. हडss.. मी नाही पिणार. पूर्वीच्या काळी ठीक होतं. पण आता मी सोशल मीडियावर पाहतोय, तिथे गेलेली माणसं, बाया त्या पाण्याने घासतायत…. आणि बाळा नांदगावकर येऊन म्हणत आहेत की, साहेब गंगेचं पाणी… कोण पिणार ते पाणी?”

श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही?

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आताच करोना गेलाय. कोणाला याशी काही देणंघेणं नाही. दोन वर्षे तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करतायंत. मी कित्येक स्वीमिंग पूल पाहिलेत, जे उद्घाटनाच्या वेळी निळे होते. हळूहळू हिरवे हिरवे होऊ लागले. कोण त्यात जाऊन पडेल? त्यात गंगेत..त्यांनी तिथे काहीतरी केलं आहे, ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? देशातील एकही नदी स्वच्छ नाही आहे.”