राज्यात सत्ता असून नसल्यासारखीच, अजित पवार गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची खदखद

राज्यात महायुतीचे सरकार असून आपला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट सत्तेत सहभागी आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात काम करताना आपण सरकारमध्ये आहोत की नाही, असा प्रश्न पडतो. आपल्यासाठी राज्यात सत्ता असून नसल्यासारखीच आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काम करू देत नाहीत. त्यामुळे प्रशासन जुमानत नसून वरिष्ठ नेत्याचे शहराकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खदखद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडली.

काळेवाडीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीला शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार अण्णा बनसोडे, शहराचे निरीक्षक सुरेश पालवे, शीतल हगवणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, श्याम लांडे, संतोष बारणे, फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, भाऊसाहेब भोईर, राजू बनसोडे, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे, माजी नगरसेविका शमीम पठाण, निकिता कदम आदी उपस्थित होते.

बैठकीत पक्ष निरीक्षक यांच्यासमोर शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली. निवडणूक झाली नसल्याने महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे. परंतु, पक्ष सत्तेत असूनही आपली कामे होत नाहीत. अधिकारी आपल्याला जुमानत नाहीत. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपच्या कलाने कारभार करीत आहेत. ते राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना किंवा नेत्यांकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या सूचनांचा विचार करीत नाहीत. भाजपच्या मंडळींसोबत तासन्तास बैठका घेतल्या जातात. परंतु, आपल्याला भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. केंद्र आणि राज्यात आपण सोबत सत्तेत असून नसल्यासारखेच आहोत, असा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार यांना उद्देशूनदेखील प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. महापालिका प्रशासन भाजप चालवत आहे. भाजपच्या आमदारांकडून प्रशासनावर आपली कामे न करण्यासाठी दबाव आणला जातो. परंतु, पक्षाकडून याकडे कोणी लक्ष देत नाही. ज्यांच्यावर शहराची जबाबदारी आहे. ज्यांच्याकडून पक्षातील कार्यकर्त्यांना अपेक्षा आहेत, तेच दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत आमदार व शहराध्यक्षांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

तर कामांबद्दल आमच्याशी संपर्क करा, सोडवणूक करण्याचे आश्वासन यावेळी आमदार बनसोडे व शहराध्यक्ष बहल यांनी दिले.

शहरात भाजपचे चार आमदार आणि आमचा एकच आमदार आहे. त्यामुळे कामे करताना कमी-जास्त होते. परंतु, आमचे नेते अजित पवार पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री आहेत. त्यामुळे कामे मार्गी लावण्याबाबत सर्वांना आश्वस्त केले. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वांनी तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या आहेत.

योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस