राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडल्यानंतर दुसऱयाच दिवशी अजित गव्हाणे यांनी 16 माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
गव्हाणे यांच्यासमवेत माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते-कार्याध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक वसंत बोऱहाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, समीर मासूळकर, संजय वाबळे, संजय नेवाळे, रवींद्र सोनवणे, माजी नगरसेविका गीता मंचरकर, वैशाली उबाळे, शुभांगी बोऱहाडे, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, विद्यार्थी आघाडीचे यश साने, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष निवृत्ती शिंदे यांनीही प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेतला असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले असले, तरी लांडे सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
अजित गव्हाणे यांनी समर्थकांसह ‘तुतारी’ हाती घेतल्यानंतर शहरात अजित पवार गटाची संघटना खिळखिळी झाली आहे. अजितदादांकडे आता मोजकेच पदाधिकारी राहिले आहेत. यामधीलही काही पदाधिकारी आगामी काळात ‘तुतारी’ हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता अजितदादांच्या पक्षाची शहरातील धुरा माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.