
पिंपरी शहरात प्रशस्त रस्ते आणि उड्डाणपूल असून, वारंवार वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असल्याने चालक त्रस्त झाले आहेत. त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरी दळणवळण विभाग सुरू केला आहे. त्यासाठी 13 अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज तयार केली आहे. मात्र, त्या विभागाने काय काम करायचे, याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा अजब कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच खासगी वाहनांची संख्याही भरमसाट वाढत आहे. शहरातील प्रशस्त रस्ते आणि उड्डाणपुलावरही वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या वेळेत सकाळी व सायंकाळी मुख्य, तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’ने पदपथ व सायकल ट्रॅक तयार केल्याने रस्ते अरुंद झाले आल्याने कोंडीत भर पडत आहे.
देशातील विविध शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थेत वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित आहेत. मात्र, महापालिकेत तसा विभाग नव्हता. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी, तसेच अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी पालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी ‘बीआरटीएस’ विभागाचे नाव बदलून ‘वाहतूक नियोजन’ असा स्वतंत्र विभाग केला. शहराचे संपूर्ण वाहतूक नियोजन सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र, त्या विभागासाठी स्वतंत्र असे धोरण निश्चित न झाल्याने हा विभाग ठोस असे काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी या विभागाचे नाव बदलून आता ‘शहरी दळणवळण विभाग’ असे केले आहे. या विभागासाठी सहशहर अभियंता (एक पद), कार्यकारी अभियंता (दोन पदे), उपअभियंता (तीन पदे), कनिष्ठ अभियंता (आठ पदे) अशी एकूण 13 पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्या पदावर नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. पूर्वी हा विभाग स्थापत्य प्रकल्प विभागाच्या अंतर्गत होता. आता हा स्वतंत्रपणे वेगळा विभाग झाला आहे. मात्र, या विभागाने काय काम करायचे, त्यांच्याकडे बीआरटीएस मार्ग की शहरातील सर्व रस्त्यांची जबाबदारी आहे, हे निश्चित करण्यात आलेले नाही. धोरण पक्के न करताच हा शहरी दळणवळण विभाग तयार करून निर्माण झालेल्या पदांवर नेमणुकाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी खरोखरच सोडवायची आहे की अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदांची खैरात वाटून हा विभाग पोसायचा आहे? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
लवकरच विभागाचे धोरण जाहीर करू!
राज्यातील मोठ्या शहरांतील महापालिकांमध्ये शहरी दळणवळण स्वतंत्र विभाग आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरी दळणवळण विभाग सुरू करून अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्या विभागाची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते धोरण जाहीर केले जाईल.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग