
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी देशभरातून 15 लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली. बुधवारी एकादशीला पर्वणीचा मुख्य दिवस होता. आज द्वादशीचा उपवास सोडून वारकरी घराच्या ओढीने परतू लागले आहेत. वारीच्या सांगतेनंतर पंढरपूर नगरपरिषदेसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते शहर स्वच्छ व रोगराईमुक्त करण्याचे. त्यासाठी तातडीने विशेष उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
दीड लाख लोकसंख्या असलेल्या शहरात 15 लाख लोकांचा मुक्काम होता. वारीच्या निमित्ताने येणाऱया या वारकऱयांना मूलभूत सेवा-सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा 24 तास राबत होती. अगदी ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत वारीचे नियोजन सुरू असते. दोन-एक महिने आधीपासून नियोजनाबाबत बैठका होत असतात.
वारी नियोजनाची सर्व सूत्रे ही जिल्हाधिकाऱयांच्या हाती असतात. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी वारकऱयांना वारी सुखकर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन वारकऱयांच्या विश्वासास पात्र राहिले. वारीच्या नियोजनासाठी 25हून अधिक शासकीय यंत्रणा काम करतात. मात्र, महसूल, पोलीस, मंदिर व्यवस्थापन, नगरपरिषद, आरोग्य, विद्युत मंडळ, रेल्वे, बस सेवा यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. जिल्हा पोलीसप्रमुख शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव आदींनी सूक्ष्म नियोजन केल्याने कोणतेही गालबोट न लागता वारीचा सोहळा आनंदाने पार पडला.
आषाढी सोहळ्याची सांगता झाल्यानंतर मोठे आव्हान असते ते शहरात स्वच्छता करण्याचे. सध्या शहरात पहावे तिकडे प्लॅस्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, केळीच्या साली, भाजीपाला, शिल्लक राहिलेले अन्न आदी कचऱयाचे ढीग दिसत आहेत.
या वर्षी वारीला भाविकांची विक्रमी गर्दी होती. शहरात जागा नसल्याने भाविकांनी पंढरपूर शहराच्या उपनगरांत मुक्काम ठोकला. काही उपनगरांमध्ये तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था नसल्याने नाइलाजाने भाविकांनी उघडय़ावर नैसर्गिक विधी उरकला. या परिसरात अस्वच्छतेबरोबरच दुर्गंधी सुटली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराई पसरण्यापूर्वी याची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. मुख्याधिकारी डॉ. जाधव यांनी वारीपूर्वीचे आवाहन लीलया पेलले आहे. आता वारीनंतर शहर पूर्ववत करण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलायला हवीत.
स्वच्छतेसाठी हातभार लावण्याची गरज
z सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था आदींनी पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी पुढे येण्याची गरज आहे. पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा तोकडी आहे. हंगामी कामगारांच्या मदतीने नगरपरिषद स्वच्छता मोहीम राबविते. मात्र, सेवाभावी लोकांनी या स्वच्छतेच्या मोहिमेत हातभार लावला तर पंढरीनगरी लवकर स्वच्छ व रोगराईमुक्त होईल.