
चांदिवली विभागातील साकीनाका सत्यनगर येथे कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्याकडे दुर्लक्ष करून पूल उभारणीचे काम हाती घेणाऱ्या मुंबई महापालिकेला मंगळवारी शिवसेनेने आंदोलनाचा दणका दिला.
साकीनाका टिळकनगर व सत्यनगर येथील 90 फूट रोडवरील नाल्यात जवळपास सात वॉर्डमधील पाणी येते. मात्र गेल्या अडीच वर्षांत हा नाला साफ करण्याचे सोडा, कुणी ढुंकूनही इकडे पाहिलेले नाही. त्यामुळे नाल्यात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नाल्यात जणू कचऱ्याचे पूल तयार झाले असून त्यावर लोक सहज चालून जातील अशी स्थिती आहे. या नाल्यातूनच एक जलवाहिनी जाते. ही जलवाहिनी इतरत्र हलवावी यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे आणि उपविभागप्रमुख अण्णामलाई यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला, मात्र प्रशासन ढिम्म आहे. आता तर इथे पूल बांधण्याचे काम हाती घेतले जात आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
नालेसफाई करा, अन्यथा…
विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंगळवारी जोरदार आंदोलन केले. अनावश्यक कामावर उधळपट्टी करण्याऐवजी नालेसफाईवर खर्च का केला जात नाही, असा सवाल सांगळे यांनी केला. इथे पूल बांधायचा असेल तर आधी नालेसफाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात विधानसभा संघटक विजेंद्र शिंदे, ज्योत्स्ना दळवी, विभाग अधिकारी मनोज (बालाजी) सांगळे, उपविभागप्रमुख अण्णामलाई, भास्कर पाटील, संतोष कासले, विधानसभा उपसमन्वयक राजेंद्र पाखरे, भगवान नलावडे, प्रमिला चव्हाण सहभागी झाले होते.