
नगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर करण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील चौंडी येथे मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नगर महापालिकेच्या प्रशासकांनीही नामांतराचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवला. महापालिकेने पाठवलेला प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला. सध्या हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.