नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडी मतदार संघातून अभिनेत्री कंगना राणावत भाजपकडून खासदार म्हणून निवडून आली. मात्र खासदार झाल्यानंतर देखील कंगना राणावत चर्चेत आहेत ते आपल्या विधानांनी.
कंगना राणावत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संसदेत उपस्थित राहत आहेत. यावेळी पत्रकारांनी कंगना राणावत यांना घेरलं आणि प्रश्न केले. यातील बऱ्याच वेळा कंगनानं विचारलेल्या प्रश्नावर बोलण्याऐवजी तो आणीबाणीच्या काळावर न्यायचा आणि लगेचच आपल्या Emergency चित्रपटाचं प्रमोशन करायचं असा प्रकार चालवल्याचं पाहायला मिळत आहे.
पत्रकारांनी कंगनाला महाराष्ट्र सदनातील CM साठीचा स्यूट मागितल्यावरून प्रश्न विचारला. त्यावर ‘महाराष्ट्र सदन हे सुंदर आहे. मी महाराष्ट्रात राहते. मला राहण्यावरून थोडं कन्फ्यूजन होतं. मात्र नंतर त्यांनी ते दूर करून मला वेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली. मला महाराष्ट्र आवडतो. जय महाराष्ट्र’ असं म्हणत पुढे लगेचच कुणी काही विचारण्याच्या आत ‘माझ्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आज निश्चित झाली आहे. आणीबाणीत आपल्या देशानं कसे हाल सोसले ते माझ्या चित्रपटातून मी दाखवलं आहे.’ असं म्हणत चित्रपटाचं प्रमोशन सुरू केलं.
व्हिडीओ सौजन्य NDTV
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना कंगना अचानक म्हणाली, ‘आपल्या संसदेत हे लोक संविधानाचं पुस्तकं उधळत आहेत आणि आरडा-ओरडा करून नाटक करत आहेत. त्यांची काळी कृत्य 6 सप्टेंबर रोजी माझ्या चित्रपटातून समोर येतील. सर्व जाणतात की हा चित्रपट येऊ नये म्हणून अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मी माझं घर – दागिने गहाण ठेवलं, तो चित्रपट 6 सप्टेंबर रोजी येत आहे. राजिव गांधींचे पुस्तक आणि यांच्या कुटुंबातून मिळालेल्या अधिकृत पुराव्यांवरून हा चित्रपट बनवला आहे. ते त्याला नाकारू शकत नाही. त्यामुळे 6 सप्टेंबर रोजी सगळं समोर येईल’.
पत्रकार = तुम्ही आज खासदारकी ची शपथ घेतलीये. तुमचं मंडी साठी काय विजन आहे?
कंगना = माझी फिल्म “Emergency” 6 सप्टेंबर ला रिलीज होत आहे. यांचे काळे कारनामे त्यातून बाहेर येणार आहेत.
प्रश्न काय उत्तर काय. एकंदरीत अवघड आहे मंडी च्या जनतेच 🤦♂️pic.twitter.com/QXMv6yrCHo
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) June 26, 2024
कंगनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टिकेची झोड उठवली आहे. ‘पार्लमेंटचा वापर पिक्चर प्रमोशनसाठी’ सुरू आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी टिका केली आहे. एका व्यक्तीनं दावा केला आहे की कंगना ला पत्रकारांनी मंडी मतदारसंघाविषयीचं व्हिजन काय असा प्रश्न विचारल्यानंतर तिनं हे भलतंच उत्तर दिलं आहे.