अवसरी-मंचर शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द येथे एका धोकादायक वळणावर पिकअप गाडी उलटली. या अपघातात वाहनचलाक थोडक्यात बचावला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या धोकादायक वळणावर मोटरसायकलचे अनेक वेळा अपघात होऊन आत्तापर्यंत तीन ते चार जणांचे बळी गेले आहेत. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या धोकादायक वळणावर गतीरोधक टाकत नसल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पिकअप वाहन मंचरकडून शिरूरकडे जात असताना अवसरी खुर्द कौलीमळा येथील धोकादायक वळणावर पिकअप गाडी शेतात उलटली. या अपघातात पिकप गाडीचा लाकडी बॉडीचे व इतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक थोडक्यात बचावला आहे. अवसरी खुर्द, कौलीमळा, जुना बैलगाडा घाट, कुटे मसाला कॉर्नर, टेमकर वस्ती इत्यादी ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने या धोकादायक वळणावर दोन वाहने समोरासमोर आल्यावर मोठे अपघात होत आहे. कौलीमळा, टेमकर वस्ती धोकादायक वळणावर अनेकदा चारचाकी वाहने उलटल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी वाहनचालक गेली तीन ते चार वर्षांपासून करत आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.