जेजुरीला दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू; 10 हून अधिक गंभीर जखमी

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी चाललेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. पिकअप वाहन आणि आयशर गाडीचा अपघात झाल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर 10 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जरेवाडी येथील भाविक रविवारी रात्री जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी निघाले होते. जेजुरीला पोहचण्याआधीच बेलसर-वाघापूर रस्त्यावर मध्यरात्री अडीच वाजता पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला. यात जितेंद्र तोतरे आणि आशाबाई जरे यांचा मृत्यू झाला.

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर लाखोंच्या संख्येने भाविक येतात. जरेवाडीतील भाविकही महाराष्ट्रातील लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या दर्शनाला चालले होते. मात्र दर्शन घेण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. दरम्यान अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.