Phule Movie- गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे सोपे! ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला सर्वात आधी ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. त्यानंतर या चित्रपटाचे जयंतीनिमित्तचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत जवळपास 12 दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटासंबंधित सर्वांचाच आणि जनमानसाचा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त होत आहे. ‘फुले’ या चित्रपटातील दृश्यांवरुन वाद सुरु आहे. यावरून आता समाजातील सर्वच स्तरातून सेन्साॅर बोर्डाला खडे बोल सुनावले जात आहेत.

यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक पोस्ट केली आहे. ‘ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेते पक्षीय मर्यादा ओलांडून त्यांना श्रद्धांजली वाहताना पाहून आनंद झाला. तरीही, ब्राह्मण गटाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्ड त्यांच्या जीवनावरील चित्रपटात काटछाट करू इच्छित आहेत. ब्राह्मणवाद आणि जातिव्यवस्थेविरुद्धच्या त्यांच्या तीव्र लढाईचा संदर्भ न देता फुले यांच्यावर प्रामाणिक चित्रपट कसा बनवायचा? गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे किती सोपे आहे, नाही का?’, असा सवाल करत त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

हिंदुस्थानातील माता-भगिनींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवनप्रवास राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना 12 बदल सुचवले आहेत. त्यामुळे त्यातील काही संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच सर्वच स्तरातून आता सेन्सॉर बोर्डचा निषेध सुरू झालेला आहे.