
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ चित्रपट हा त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटातील 12 दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आल्यामुळे, या चित्रपटावर टांगती तलवार आलेली आहे. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटावरून गोंधळ सुरू झाला असून सर्वच स्तरातून सेन्सॉर बोर्डाचा निषेध सुरू आहे. तसेच चित्रपटातून सत्य मांडण्यात यावे, जातीव्यवस्थेविरोधात ज्योतिबा फुले यांनी उठवलेला आवाजाचा इतिसाह मांडण्यात यावा असे मत समाजातील विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

अभिनेता किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून खरमरीत पोस्ट केली आहे. फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी जातीभेदाला खतपाणी घालणाऱ्या विचारांच्या व्यक्तींना लक्ष्यं केलं आहे. तत्कालीन जातीभेदामुळे महात्मा फुलेंना सहन करावे लागलेले प्रसंग चित्रपटातून हटवण्याची मागणी ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आणि सेन्सॉरने देखील त्याप्रमाणे पाऊले उचलण्यास सांगितल्यानंतर किरण माने यांनी आपला आक्षेप नोंदवला.
आपल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी चित्रपटातून सत्यप्रसंग वगळण्याची मागणी केलेल्यांना त्यांनी महाकारस्थानी म्हटले आहे. किरण माने म्हणतात, ‘महाकारस्थ्यांनी ‘स्पॉन्सर्ड’ केलेल्या दिग्दर्शकांनी छत्रपती शिवरायांवर सिनेमे काढून अलगद मुस्लीमद्वेष पेरला. प्रेक्षकांना शिवरायांच्या खर्या सर्वसमावेशक विचारांपासून दूर नेण्यासाठी रचलेले ते कपट होते. कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यामुळे त्या लोकांच्या मनात शिवरायांविषयी काय घाण भरली आहे ती बाहेर आलेली आहे. याच वृत्तीच्या पिलावळीनं बनवलेले सिनेमे आपण जयजयकार करत बघितले होते, हे लक्षात घ्या. ही बांडगुळं आता ज्ञानोबा,मुक्ताबाई आणि तुकोबारायांवर ‘डल्ला’ मारायला सज्ज झाली आहेत… महात्मा फुलेंनी अडाणी बहुजनांना नाडणाऱ्या भटशाहीला ज्या निर्दयपणे दणके दिलेत ते त्याच तीव्रतेनं सिनेमात असतील का? याविषयी मला शंका आहे. त्यांनी शोधलेली शिवरायांची समाधी… सुरू केलेला पहिला शिवजयंती उत्सव…बहुजन हिंदु मुस्लीमांना एकमेकांत लढवून स्वत: वर्चस्व गाजवणार्या मनुवादी वृत्तीला शह देण्यासाठी महात्मा फुलेंनी महंमद पैगंबरांवर रचलेला सुंदर पोवाडा… हे सगळं त्या सिनेमात असेल का???’
पुढे त्यांनी जनतेला , ‘माझ्या भावाबहिणींनो… शक्यतो महामानवांवरचे सिनेमे बघूच नका. तुमचं महामानवांवर लैच जबरदस्त प्रेम असेल, तर महामानवांचा खरा इतिहास सांगणारी असंख्य पुस्तकं आहेत, ती वाचा’, असं आवाहन केलं आहे.
किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे.