Phule Movie-सावित्रीमाईंवरील शेणफेकसह अनेक दृश्य आणि शब्दांवर सेन्साॅर बोर्डाचा आक्षेप, बोर्डाच्या निर्णयाविरोधात सर्व स्तरातून संताप

‘फुले’ चित्रपटाच्या ट्रेलर वादावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे जनतेमध्ये रोष पाहायला मिळत आहे. नामदेव ढसाळ यांच्या ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला परवानगी नाकारल्यामुळे, वातावरण तापलेले असतानाच आता फुले या चित्रपटामुळे सेन्साॅर बोर्डाच्या विरोधात अधिक वातावरण तापले आहे.

या चित्रपटातील डिस्क्लेमरचा टाइम वाढवण्यासाठी सेन्साॅर बोर्ड आग्रही आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांवर सेन्साॅरने आक्षेप घेतला आहे. यातील महत्त्वाचे दृश्य म्हणजे, काही मुले सावित्रीमाईंवर शेण फेकत आहेत ही दृश्ये बदलावी अशी मागणी सेन्साॅर बोर्डाने केली आहे. तसेच या चित्रपटातील ‘शूद्राने झाडू बांधून चालावे…’ हे वाक्य ‘आपण अशाच प्रकारे सर्वांपासून अंतर राखले पाहिजे का ?’ असा सुधारित बदल करण्यास सांगितले आहे. ‘मांग’, ‘महार’ यांसारखे शब्द ‘ऐसी छोटी छोटी जाती’ बदलावे, अशा सूचना सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना दिल्या आहेत.

थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला सर्वात आधी ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. त्यामुळे या चित्रपटाचे जयंतीनिमित्तचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत जवळपास 12 दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटासंबंधित सर्वांचाच आणि जनमानसाचा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त होत आहे.

हिंदुस्थानातील माता-भगिनींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवनप्रवास राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना 12 बदल सुचवले आहेत. त्यामुळे त्यातील काही संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.