Photo Pro Kabaddi: यूपी योद्धाज प्रथमच उपांत्य फेरीत

 

यूपी योद्धाजने पहिल्या एलिमिनेटर लढतीत दोन वेळच्या विजेत्या जयपूर पिंक पैंथर्सचा ४६-१८ असा २८ गुण फरकाने धुव्वा उडवत प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत धडक दिली. भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या चौफेर चढाया अन् हितेश, सुमित, महेंद्र सिंग या बचावफळीची तगडी साथ ही यूपी योद्धाजच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. आता उपांत्य लढतीत त्यांच्यापुढे बलाढ्य हरियाणा स्टिलर्सचे कडवे आव्हान असेल. (सर्व फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे)

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. यूपी योद्धाज अन् जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील बाद फेरीची लढत अगदीच एकतर्फी झाली. भवानी राजपूत आणि गगन गौडा यांनी खोलवर चढायांनी आक्रमक सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचे बचावपटूही पूर्ण क्षमतेने साथ देत होते. यूपीच्या उंचपुऱ्या चढाईपटूंना रोखण्यात जयपूरला अपयश आले. पूर्ण सामन्यात दोन्ही सत्रांत प्रत्येकी दोन लोण असे चार लोण देत यूपीने जयपूर संघाची कोंडी केली. सुरजित सिंगचा अनुभव त्यांच्या मदतीला येऊ शकला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जयपूरला केवळ अर्जुन देशवालवर अवलंबून राहावे लागले. मात्र, आज त्याला लयच गवसली नाही. चार चढायांत केवळ दोन गुण मिळविणाऱ्या अर्जुनला उत्तरार्धात बाहेर बसवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे मध्यंतरातील १५ गुणांचे दडपण घेऊन उतरलेल्या जयपूर संघाला सामन्यात राहण्याचा मार्गच सापडला नाही. यूपीकडून भवानी राजपूतने १२, तर बचावात हितेश आणि सुमितने अनुक्रमे ६ आणि ५ गुणांची कमाई केली. त्यांना महेंद्र सिंगने चार गुण मिळवत सुरेख साथ केली.