काय सांगता! डास मारा अन् पैसे कमवा, डेंग्यूमुक्तीसाठी फिलिपिन्सची अनोखी मोहीम

मच्छर चावल्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेणे आजार होतात. तसेच साथीचे आजारसुद्धा होण्याची भीती असते. मच्छरांपासून होणारे रोग रोखण्यासाठी डास निर्मूलनासाठी फिलिपिन्स देशात डास मारा आणि पैसे कमवा अशी एक अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे. फिलिपिन्स देशात मनिला येथे अशी अनोखी मोहीम राबवली जात आहे. डासांपासून होणारे रोग आणि मच्छरांची पैदास कमी करण्यासाठी जनतेच्या प्रत्यक्ष सहभागीसाठी अशा मोहीम राबवण्यात येत आहेत. येथील काही ठरावीक ठिकाणी नागरिक रांगेत उभे राहून मारलेल्या मच्छरांचा पुरावा देत पैसे कमवतात. किती मच्छर मारले यावर आरोग्य विभाग नागरिकांना पैसे देत आहे. ही मोहीम चांगलीच यशस्वी झाली आहे. ही योजना यशस्वी होईल की नाही, अशी भीती आरोग्य विभागाला होती. काही जण पैसे कमावण्यासाठी याचा गैरफायदा घेतील असेही अधिकाऱ्यांना वाटत होते, परंतु असे न होता या मोहिमेमुळे डासांची संख्या कमी होण्यास मदत मिळाली आहे. डासांपासून होणाऱ्या रोगांना दूर करण्यासाठी जनता यात सहभागी होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.