
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रोडवरील उमरी फाट्याजवळ असलेल्या चिंतामणी पेट्रोलपंपाच्या मालकाने पंपावर काम करणाऱ्या युवकावर पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना बाहेर आली. या पंपावर मयूर गायधने हा युवक कामाला आहे. त्याच्यावर मालकाने सोमवारी सायंकाळी चक्क पिस्तूल रोखून धाक दाखविला आहे .
उमरी फाटा येथील चिंतामणी पेट्रोल पंप हा वर्धा येथील डहाके यांच्या मालकीचा आहे. मयूर गायधने याच्यासोबत मालक व त्याच्या मुलगा यांच्यात हिशेबावरून वाद झाला. पेट्रोल पंपाचा मालक व त्याच्या मुलाने मयूर गायधने यास बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्यावर पिस्तूल उगारुन त्याला धमकविण्यात आले. याची माहिती मयुरने आपल्या नातेवाईक व मित्रांना दिली. त्यानंतर सर्वांनी कळंब पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावेळी आमला गावातील नागरिकांनी कळंब ठाण्यात मोठी गर्दी केली होती.
या घटनेची तक्रार येताच कळंब पोलिसांनी पेट्रोल पंपाचा मालक व त्याच्या मुलाला ठाण्यात आणले. त्यांच्या जवळून पिस्तूल जप्त करण्यात आली. ही पिस्तूल एअरगन असल्याचे पेट्रोल पंपाच्या मालकाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली असून आरोपींवर भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या 3 (25) अन्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी दिली आहे . दरम्यान गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच आमला येथील सरपंच विशाल वाघ यांच्यासह गावकऱ्यांनी कळंब पोलीस ठाणे गाठून हा पेट्रोल पंप बंद करण्याची मागणी केली आहे.