![arrest](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/07/arrest-696x447.jpg)
एनसीसी कॅम्पवर झालेल्या पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्याने आज पेण हादरून गेले. म्हाडा कॉलनी येथील गुरुकूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर स्काऊट गाईड कॅम्पसाठी सहा तंबू उभारण्यात आले आहेत. पहाटे 4 वाजता या तंबूवर पेट्रोल बॉम्ब फेकून माथेफिरू तरुण पळून गेला. यामध्ये एक तंबू जाळून खाक झाला. सुदैवाने तंबूमध्ये कुणी नसल्याने जीवितहानी टळली. या हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलिसांची विविध पथके तपास करत होती. यातील एका पथकाने माथेफिरूला अटक केली. समीर पाटील (रा. वढाव, ता. पेण) असे आरोपीचे नाव असून पोलीस हल्ल्यामागची कारणे शोधत आहेत.
शिक्षण महिला समितीच्या गुरुकूल इंग्लिश मीडियम शाळेमधील इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्यर्थ्यांसाठी शाळेच्याच मैदानावर स्काऊट गाईड कॅम्पचे आयोजन केले होते. यासाठी सहा तंबू उभारले आहेत. दिवसभरातील सराव आणि सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री सर्व स्काऊट, शिक्षक गुरुकूल शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये झोपण्यास गेले होते. पहाटे 4 वाजता अचानक पेट्रोल भरलेल्या बाटल्या तंबूंवर फेकल्याचा आवाज आला. काही क्षणातच आगीचा भडका उडाला.
पेट्रोल बॉम्बच्या आगीत सहा तंबूंपैकी एक तंबू पूर्णतः जळून खाक झाला. या हल्ल्याची गंभीर दखल घेत पेण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. उपनिरीक्षक समद बेग, विशाल झावरे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेश पाटील, प्रकाश कोकरे, सचिन व्हस्कोटी, अजिंक्य म्हात्रे, संतोष जाधव, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, गोविंद तलवारे यांचे पथक हल्लेखोरांचा शोध घेत होते.
55 सीसीटीव्ही तपासले
पोलीस पथकाने शाळा परिसरातील 55 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र एकाही सीसीटीव्हीत संशयित दिसला नाही. गुन्हा करताना छुप्या रस्त्याचा वापर केल्याने आरोपी हाती लागत नव्हता. त्यामुळे आरोपीला पकडण्याचे आव्हान होते. मात्र गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पेण पोलिसांनी समीर पाटील याला अटक केली.