पतसंस्थेचा घोटाळा गिरीश महाजनांना भोवणार, लाभ घेऊन तपासावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप

तब्बल एक लाख 69 हजार गुंतवणूकदारांची 167 कोटींची फसवणूक झालेल्या घोटाळ्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे बीटकॉईनचा पारदर्शक तपास केल्यानेच पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांनी सूड उगावत कारवाई केल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण भाजप मंत्री महाजन व पोलीस महासंचालक डॉ. शुक्ला यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी ही याचिका केली आहे. बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देताच गृह विभाग व पोलीस महासंचालकांनी कारवाई केली आहे. है गैर असून नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पुढील महिन्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजनांनी धमकावले

लाभार्थी म्हणून गिरीश महाजन यांचे पतसंस्था घोटाळ्याच्या अंतरिम फॉरेन्सिक अहवालात नाव आले आहे. हा अहवाल व आरोपपत्र कोर्टात दाखल झाले आहे. याचा राग ठेवून मंत्री महाजन यांनी धमकावले. आरोपी सुनील झवारने काहीच केलेले नाही. तुम्ही त्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे, असे मंत्री महाजन यांनी धमकावले. मी गुंतवणूकदारांच्या हिताची भूमिका घेईल, अशी आरोपी झवार व महाजन यांना भीती आहे. पण मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, असेही आयपीएस अधिकारी नवटके यांनी याचिकेत नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी ही याचिका केली आहे. जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याचा तपासात दोष आढळल्याने आयपीएस अधिकारी नवटके यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आयपीएस अधिकारी नवटके यांनी याचिका केली आहे. या याचिकेत पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

पोलीस महासंचालकांचे आरोपीसोबत लागेबांधे

बीटकॉईन घोटाळ्यात आरोपी पंकज घोडेला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने मला धमकावले होते. सीबीआय व अन्य तपास यंत्रणा तुला खोटय़ा गुह्यात अडकवतील, असेही पंकज म्हणाला होता. त्यानंतर सीबीआयने मला चौकशीसाठी बोलावले. पोलीस महासंचालक डॉ. शुक्लांचे आरोपी पंकजसोबतचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत आहेत. माझ्यावर राग ठेवूनच पोलीस महासंचालक डॉ. शुक्ला यांनी कारवाई केल्याचा दावा नवटके यांनी याचिकेत केला आहे.