
उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर येथील जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत एक्स हॅंडल हॅक करणाऱ्या आरोपीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. नोएडा पोलिस स्टेशन सेक्टर-20 पोलिसांनी आरोपीला पकडले. डीएमचे खाते हॅक करून आरोपींनी राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहन सिंह असे आरोपीचे नाव आहे. त्याला दिल्लीतील बुराडी येथून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून फोन जप्त केला आहे. खरं तर, गौतम बुद्ध नगर डीएमच्या अधिकृत एक्स हँडलवरून काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना ट्रोल करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टने शुक्रवारी वाद निर्माण केला होता. ज्यामध्ये नोकरशाहीतील राजकीय पक्षपातीपणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी इतिहासकार अशोक पांडे यांच्याशी झालेल्या संभाषणाची क्लिप X वर पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी टिप्पणी केली की, ‘इतिहास घडतो आणि बदलता येत नाही. इतिहास त्यांना कसा लक्षात ठेवेल हे नरेंद्र मोदींना माहीत आहे आणि त्यामुळेच ते चिंतेत आहेत. याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या एक्स अधिकृत हॅण्डलवरुन आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती.
गोंधळाच्या दरम्यान, गौतम बुद्ध नगर जिल्हाधिकारी यांनी एक स्पष्टीकरण जारी केले होते आणि दावा केला होता की पोस्ट त्यांनी लिहिलेली नाही आणि त्यांच्या हँडलचा गैरवापर करण्यात आला.