मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात असून, यात वाल्मिक कराड यांच्यावरही आरोप केले जात आहे. आरोपींना पकडले जात नसल्याबद्दल मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे. आरोपी सापडत नसल्याबद्दलही जरांगेंनी नाराजी व्यक्त केली. तसेच जर तुम्हाला जमत नसेल तर जनताच तपास करेल, ती वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
प्रसार संवाद साधताना मनोज जरांगेंनी म्हणाले की, तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय वचका काय असतो ते… ती वेळ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कॉल्सची माहिती काढायला तुम्हाला 20 दिवस लागतात का?, असा सवाल मनोज जरांगेंनी सरकारला केला. देशमुख यांच्या कुटुंबाची मागणी आहे ना चौकशीची, तर दणादण चौकशी करायची. का करत नाहीत? त्याचं फळ यांना भोगावं लागेल. कुणाचाही बाप येऊ द्या. मी ते प्रकरण दबू देणार नाही. पूर्ण बाहेर काढणार आहे. तुमच्या चौकशीत जर सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, तर बंदोबस्त मराठे करणार, असा इशाराही मनोज जरांगेनी सरकार आणि फडणवीसांना दिला.
इतका निर्घृण खून, त्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत. अरे ते चिलटे आहेत. तुम्हाला ते सापडत का नाहीत? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही सहज जीव घेणार… कुठे पैसे देणार, कुठे नोकरी देणार. जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच? त्या आरोपीला अटक नाही होणार? कुटुंबाने ज्यांची जाहीरपणे नावे घेतली आहेत, ते तुरुंगातच गेले पाहिजेत. हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. नाही गेलं, याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागेल. मी तर सोडणारच नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.