मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण व्यवस्थेचे प्रणेते आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना (जगन्नाथ) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देऊन केंद्र सरकारने त्याचे तत्काळ ‘नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’ असे नामांतर करावे, अशी जोरदार मागणी नाना शंकरशेट प्रतिष्ठान आणि दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने केली आहे. 31 जुलै रोजी नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथी दिनी महाराष्ट्रातील नानाप्रेमी ग्रॅण्टरोड येथील नाना चौकात साखळी उपोषण करून केंद सरकारचे लक्ष वेधणार आहेत.
आशिया खंडात पहिली रेल्वे हिंदुस्थानात धावली ती केवळ नाना शंकरशेट यांच्या अथक प्रयत्नांमुळेच. त्यासाठी नानांनी स्वतःची तिजोरी खुली केली. इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीची स्थापना केली. त्यामुळे 1853 साली मुंबई-ठाणे मार्गावर पहिली रेल्वे धावली. या रेल्वेने प्रवास करणारे नाना शंकरशेट हे पहिले प्रवासी ठरले. हिंदुस्थानी रेल्वेचे पहिले कार्यालय नानांच्याच वाडय़ात सुरू करण्यात आले. या हिंदुस्थानी रेल्वेच्या जनकाचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देऊन त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी राज्य सरकारने मार्च 2020 मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात बिनविरोध प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला; परंतु गेल्या चार वर्षांपासून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या फायलीत धूळ खात पडला आहे. नाना शंकरशेट प्रतिष्ठान, दैवज्ञ समाजोन्नती परिषद व विविध संस्थांनी पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने 31 जुलै रोजी नाना शंकरशेट यांच्या 159व्या पुण्यतिथीनिमित्त नाना चौकात साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस एडवोकेट मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली.
शिवसेनेने लोकसभेत सरकारचे लक्ष वेधले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’चा मुद्दा पुन्हा एकदा मांडून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. रेल्वेच्या जनकाला त्यांच्या सन्मानाची आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल सावंत यांनी केला.